साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया अक्षोणी ।
विवेकवल्लीची लावणी । हो देई सैंघ ।।
मराठी साहित्य सारस्वताचे महर्षित्व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अद्वितीय ग्रंथ कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. श्री ज्ञानराजांनी महालयक्षेत्री (नेवासा) सद्गुरू श्री संत निवृत्तिनाथांच्या आदेशातून रसाळ-मधुर मराठी भाषेमध्ये १२ व्या शतकात श्रीमद्भगवत गीतेचा अर्थ सांगितला. श्री ज्ञानराजांच्या व्यक्तित्वाचा गुणविशेष म्हणजे संवाद होय. 'ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीस' श्रोतृ-संवाद म्हटले जाते. संस्कृत भाषेचे ज्ञान तत्कालीन समाजास अवगत नसल्याची जाणीव असल्याने माउलीच्या कळवळ्याने श्री ज्ञानराजांनी गीतेस अधिष्ठान ठेवून अबाल-वृद्धांसह समाजातील सर्व ज्ञाती बांधवांशी संवाद केला. श्री ज्ञानराजांच्या संवाद कौशल्याचे विशेष काय तर साहित्यातील नऊ रसांचा त्यांनी नेमक्या वेळी केलेला उपयोग. म्हणूनच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा साहित्याची खाण आहे
श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गेली ७२५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राने संचित म्हणून गौरवाने पूजिला आहे. श्री ज्ञानराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी "म्हणोनी रिकामे तोंड। करू गेले बडबड। की गीता ऐसे गोड। आतुडले।।" .... गीतेचे तत्त्व सर्वसामान्यांना समजेल, उमजेल आणि पचेल अशा शब्दांच्याद्वारे सांगितले. ज्या भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन त्याच्या विषादाचा नाश केला आणि अर्जुनाच्या जीवनात आनंदाचे कल्लोळ निर्माण केले तोच ज्ञानोबा १२व्या शतकात अनेक अर्जुनांना तोषविण्यासाठी महाराष्ट्र भूमिमध्ये श्रीक्षेत्र अलंकापुरी येथे अवतार धारण करून चिरंतन चैतन्य स्वरूपात समाधिस्थ आहे.
तेणें आबालसुबोधें। ओवीयेचेनि प्रबंधें।
विवेकवल्लीची लावणी । हो देई सैंघ ।।
वाचावी ज्ञानेश्वरी I डोळा पहावी पंढरी I ज्ञान होय अज्ञानाशी I ऐसा वर या टीकेशी II ज्ञान होय मुढा I अति मूर्ख त्या दगडा I वाचलं जो कोणी I जनी त्याच्या लोटांगणी II ओळख श्री ज्ञानेश्वरीची - एक परिवार या उपक्रमामध्ये श्री. ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी ही सहभागी आहे याबद्दल मला मनापासून अभिमान वाटतो. आमच्या संस्थेचे जेष्ठ विश्वस्त आदरणीय श्री. प्रकाश काळे यांनी मागील पाच वर्षापासून हा उपक्रम आमच्या शाळेतून सुरू केला आणि आज हा महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सुरू आहे याचे मला खूप कौतुक वाटते. खरंतर ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमाच्या माध्यमातून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ही पोहोचत आहे आणि विद्यार्थ्यांवरती अध्यात्मिक मूल्यांचे संस्कार हे योग्य वयात आणि योग्य ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.
मुलांनी ज्ञानेश्वरी अभ्यासली पाहिजे ती वाचली पाहिजे आणि त्यातून नवीन पिढी ही निर्माण झाली पाहिजे आणि हेच आपल्या देशाचे भवितव्य आहे. ते भवितव्य संस्कारक्षम, आदर्श व मूल्याधिष्ठित असले पाहिजे यासाठी हा उपक्रम “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” याच्या माध्यमातून राबवला जात आहे व मी त्याचा एक भाग आहे ही खरोखरच ज्ञानेश्वर माऊलींची आज्ञा असावी असे मला वाटते आणि मी हे काम अतिशय मनापासून करीत आहे याचा मला अभिमान आहे. राम कृष्ण हरी…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही वयाच्या सोळा वर्षे लिहिली आणि संपूर्ण विश्वाला वैश्विक शांतीच वरदान मागितलं ही गोष्टच अलौकिक आहे. ज्ञानेश्वरी ही फक्त वाचण्यासाठी नसून ती मानवाला वाचविण्यासाठी आहे. आणि या ज्ञानेश्वरीतील ज्ञान हे किशोर आणि युवा पिढीतील विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे जेणेकरून ही संस्कारक्षम पिढी घडेल. ओळख श्री ज्ञानेश्वरी ची या उपक्रमामध्ये श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करून ‘’ओळख श्री ज्ञानेश्वरीची’’ या उपक्रमाची 2021 पासून आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये सुरू करण्यात आला आज जवळजवळ आळंदी परिसरातील 65 शाळा पर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. नुकताच मुक्ताईनगर जळगाव येथील 11 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे.
सदर उपक्रम हा राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इ. आठवी पासूनच्या विद्यार्थ्यांना श्री ज्ञानेश्वरी मधील विविध विषय, इ. चौथी पासूनच्या विद्यार्थ्यांना हरिपाठाचे पाठांतर आणि अर्थ विवेचन सांगितले जाते व वर्षातून दोन वेळा लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सुद्धा करण्यात येते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक मूल्य संस्कार व्हावेत, मुलांमध्ये संत विचार व आध्यात्मिक वाड्मय पोहोचावे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्यामध्ये सभाधिटपणा हा गुण यावा यासाठी सदर उपक्रम हा राबविण्यात येतो.
सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना संस्कार शिक्षण देण्यासाठी आणि अध्यात्मिक शिक्षणाची जोड मिळण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांचे, संस्थापकांचे, पालकांचे व शिक्षकांचे मी आभार मानतो आणि या उपक्रमाला आपली साथ मिळावी अशी माऊली चरणी प्रार्थना करतो. हा उपक्रम राबवणे ही माऊलींची इच्छा असावी.
श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या पुढाकाराने, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्कम आधाराने, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयोगाने आणि पत्रकार संघ आळंदी यांच्या जबाबदार प्रामाणिक प्रसिद्धी माध्यमांमुळेच 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' हा शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि संस्कारक्षम उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविला जात आहे. हा उपक्रम श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सतत तीन वर्ष प्रयोगशील तत्त्वावर राबविलेला आहे. या उपक्रमामुळे मुलांचा स्वभाव, वर्तन, एकाग्रता, गुणवत्ता आणि सर्व समावेशकता यासारख्या सदगुणांचा मुला-मुलींवर मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. हा सकारात्मक परिणाम फक्त प्रशालेतील मुला-मुलींवरच नाही तर शाळा, कुटुंब, पालक यांच्या समवेत समाजाच्या इतर घटकावर सुद्धा झालेला दिसून येतो. आळंदी देवाची पंचक्रोशीतील अनेक संस्थाचालक हा उपक्रम आमच्याही शाळेत राबविला जावा अशी वारंवार विनंती श्री प्रकाश शेठ काळे (तात्या) यांच्याकडे करू लागले आहेत. तेंव्हा पुणे जिल्ह्यातील ५८ शाळेत हा उपक्रम सुरू झालेला आहे. दरम्यानच्या काळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अभ्यासू विश्वस्त डॉ. श्री. अभयजी टिळक सर यांनी मार्गदर्शनासाठी एक पुस्तिका सुद्धा प्रकाशित केलेली आहे. वर्षभरासाठी मूल्याधारित स्वतंत्र वेगवेगळे पाठ ज्ञानेश्वरीच्या आधारे लिहावेत अशी मागणी प्रकाशशेठ काळे यांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे नवीन विश्वस्त मंडळाकडे केली, त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम मुलांच्या समोर आला. डॉ. अभय टिळक सर यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ समोर ठेवून थोड्या नाविन्यपूर्ण बाबी समाविष्ट करत हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
ज्यांच्या अनंत कल्पांच्या तपाने, ऋतंभरा प्रज्ञेने, नाथपरंपरेच्या समाधिधनाने परतत्त्वाच्या स्पर्शाने साकारलेली अजरामर साहित्यकृती म्हणजे भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी' अशी नवीन साहित्य सृष्टी निर्माण करणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सादर समर्पण ...
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीमार्गाचा महामंत्र म्हणून रचलेली 'हरिपाठ' ही वाणी, नामस्मरणाच्या शक्तीचा महिमा सांगणारी, मोक्षसाधनेचा सुगम मार्ग दर्शवणारी! या पावन अभंगमालेला सादर वंदन...
ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानराज माऊली तुकाराम ||